मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुंबईतील साकीनाका बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून आता विरोधकांना सरकारला निशाणा साधला आहे. अशातचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. साकीनाक्यातील दुर्दैवी घटनेचं राजकरणं करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं राजकारणं करणं म्हणजे मृताच्या टाळूवरंच लोणी खाण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांना सुनावले आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आता काही ठिकाणी माणसं जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. ते टाळायला हवं. या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असं राऊत यांनी सांगितलं.
ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं ते म्हणाले.