कोल्हापूर राजमुद्रा वृत्तसेवा | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणावर आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे समाज हादरुन गेलाय. ज्या प्रकारे ही घटना घडली आहे, यात अनेकजण आहेत. कडक शिक्षा झाली पाहिजे. त्या शिवाय अशा प्रवृत्तींना धाक निर्माण होणार नाही. गेल्या चार दिवसातील ही सहावी घटना आहे. महिलांवर अत्याचार होत असताना कारवाई होत नसल्यामुळे अशा घटनांमधील सराईतपणा वाढल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अशा घटनांमध्ये सहभाग दिसतोय. तर इथे सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जातोय. कमी कलमं लावली जात आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. पटापट जामीन होत आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पण आता पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार, अशी खोचक टिप्पणीही पाटील यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती. आरोपीने केलेल्या या कृत्त्यात पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती. आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.