मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली असून सोमवारी एक बॉम्ब टाकणार आहेत. शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपल्या रडारवर आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमवारी पत्रकरा परिषद घेत दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे की, माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनाही घेरलं. उत्तर आणि प्रत्युत्तर द्यायला हा काय मुशायरा नाहीये. ठाकरे सरकार आणि आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्राची वाट लावली. त्यामुळे घोटाळेबाज मंत्र्यांना शिक्षा व्हावी हा उद्देश आहे. एखादा कुठला तरी निकाल आला की काही मंत्र्यांना चार दिन की चांदनी असं वाटतं. पाच- पंधरा दिवस त्यांना शेरोशायरी करू द्या, असा चिमटा सोमय्या यांनी काढला.