नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा | नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा पूरग्रस्त दौरा वादळी ठरला आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले.
पालकमंत्री छगन भुजबळ हे नुकसान पाहणी दौऱ्यावर होते. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यांची लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक होती. या बैठकीला शिवसेना आमदार सुहास कांदे हे सुद्धा उपस्थित होते. आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाल. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. सुहास कांदे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त निधीवरुन तात्काळ मदतीची मागणी केली. सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी सुहास कांदे यांनी दिली. यावेळी भुजबळांनीही तशीच मदत दिली जाईल असं सांगितलं. मात्र, या दोघांमध्ये नुकसानीच्या तातडीच्या मदतीवरुन शाब्दिक चकमक सुरु झाली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोघेही मोठ मोठ्या आवाजात भांडू लागले. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.