मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करू नये. कोण मंत्री त्याचं नाव सांगावं, असं सांगतानाच पाटलांना अफवा पसरवण्याची सवयच आहे, असा हल्लोबाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाखाली मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही, असं ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने मला सांगितलं होतं, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक मंत्री कोण? असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. आणि कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाहीत. चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी अशा अफवा पसरवित असतात. त्यांना आनंद मिळतो. त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. पण महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षे चालेल. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. त्याबाबत त्यांनी निश्चित राहावं, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
नजीकच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्तरावर काम करू शकतात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो, असं त्यांनी सांगितलं. तसेच शेतकर्यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.