जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव ते धुळे महामार्गावर पारोळा येथे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी रास्ता रोको आंदोलन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे सुरू असलेली रस्त्यांची कामे निकृष्ट आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे (एनएचएआय) कामे सुरू आहेत. आंजग ते तरसोद या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अत्यंत धिम्यागतीने होत आहे. त्याबाबत नागिरकांनीही तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे निकृष्ठ रस्त्याचे काम कंत्राटदार करीत असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. ते म्हणाले, जळगाव ते पारोळा मार्गावर वाहनधारकांना जा- ये करण्यासाठी कसरत करावी लागते, हा रस्ता अत्यंत खराब आहे. शिवाय या रस्त्यावर काम सुरू आहे. परंतु कुठे नुसताच मुरूम टाकला आहे. काही ठिकाणी काळी माती टाकली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे खोदून ठेवलेले आहेत. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष देवून चांगल्या दर्जाचे काम केले नाही, तर आगामी काळात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. अधिकाऱ्यांना आम्ही सळो किंवा पळो करून सोडणार आहोत. या संदर्भात आमदार पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन दिवसापूर्वी पत्र दिले आहे.