(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) धुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी साकारण्यात येत असलेली अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना प्राधान्याने डिसेंबर २०२१ पर्यंत प्राधान्याने पूर्ण करून धुळेकरांना दररोज पाणी पुरवठ्याची सोय करून देण्यात यावी यासाठी तत्परतेने प्रशासनाने काम हातात घ्यावीत, असा निर्देश खा.डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिला आहेत.
धुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून खा.डॉ. सुभाष भामरे यांनी भरघोस असा १६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईप लाईन योजना व जलशुध्दीकरण केंद्र मंजूर करून घेतले आहे. या योजनेतर्ंगत अक्कलपाड्यापासून हनुमान टेकडी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. धुळे शहरापर्यंत पाईपलाईन आली असून अक्कलपाडा धरणाजवळच जलशुध्दीकरण केंद्र आणि धरणातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेलची उभारणी अशी दोन महत्त्वाची कामे अद्याप बाकी आहेत. त्याचेही काम मार्गी लावण्यात आले आहे. दरम्यान योजनेच्या कामाचा आज खा.डॉ. सुभाष भामरे यांनी आढावा घेतला. यासाठी महापालिका सभागृहात महाराष्ट्र जिवन प्राधीकरण, महापालिका आणि योजनेचे काम करीत असलेल्या कंत्राटदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर चंद्रकांत सोनार, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेश पवार, उपायुक्त शिल्पा नाईक, अभियंता कैलास शिंदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस.सी. निकम आदी उपस्थित होते.
या बैठकीत खा.डॉ. सुभाष भामरे यांनी अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे काम सद्यस्थितीत कसे सुरू आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी मजिप्राच्या अधिकार्यांनी पाईपलाईन टाकण्याच्या कामासह जॅकवेलचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र कामाची गती अतिशय संथ असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोना आणि विविध कारणांमुळे काम लांबले. राज्य शासनाने सहा महिन्यांच्या मुदतवाढ दिली आहे. आता जुलै पर्यंत पावसाळा सुरू होईल. १४ महिने झाले योजनेचे काम सुरू आहे. ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. शासनाने ६ महिने मुदत वाढ दिली असल्याने डिसेंबर पर्यंत योजना पूर्ण झाली पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाने लक्ष घालावे. युध्द पातळीवर काम पूर्ण करून घ्यावे. महापालिकेला देखील यातसहकार्यकरावे,अशा सूचनाखा.डॉ.सुभाषभामरेयांनीदिल्या.
अक्कलपाडा योजनेचे काम सुरू असले तरी शहरातील पाणीपुरवठा नियमित होईल, यासाठी महापालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा खंडीत होणार असेल, एक-दोन दिवस उशिर होणार असेल, तर त्याची माहिती वृत्तपत्रातून जनतेला द्यावी. पाणी पुरवठा खोळंबला तर त्यात प्रशासनाची, पालिकेची आणि पर्यायाने सत्ताधारी पक्षाची बदनामी होती. किमान १ दिवस अगोदर तरी लोकांना सांगितले तर, नागरिक पाण्याचे नियोजन करतील. अशी सुचनाही खा.डॉ. सुभाष भामरे यांनी मनपा अभियंता कैलास शिंदे यांना केली. या बैठकीत भाजपाचे नगरसेवक सुनिल बैसाणे, संजूबापू पाटील, हिरामण गवळी, प्रदीप कर्पे, किरण अहिरराव, भगवान गवळी, दगडू बागुल,भगवान देवरे, प्रविण अग्रवाल,राकेश कुलेवार आदीउपस्थित होते. भुमिगत गटार योजनेच्या कामाचाही घेतला आढावा.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला असून त्यातून धुळे शहरातील देवपूर भागात भुमिगत गटार योजना राबवली जात आहे. भुमिगत गटार योजनेच्या कामाचा देखील आज महापालिकेत झालेल्या बैठकीत खासदार डॉ भामरे यांनी आढावा घेतला. ११० कि.मी. भुमिगत पाईप टाकण्यात आले आहेत. सांडपाणी शुध्दीकर प्रकल्पाचेही काम ५० टक्के पुर्ण झाले असून खोदलेल्या रस्त्यांपैकी ३५ कि.मी.चे रस्ते दुरुस्त करण्यात आले असल्याचे यावेळी अधिकार्यांनी सांगितले. मात्र नगरसेवक आणि नागरीकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्या सर्व तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करावा. भुमिगत गटार योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते त्वरीत दुरुस्त करण्याच्या सुचना खासदार डॉ भामरे यांनी यावेळी दिल्या. पावसाळ्यापुर्वी देवपूरातील रस्ते दुरुस्त करुन नागरीकांचा त्रास कमी करावा असे सक्त आदेशही यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.