भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव राष्ट्रवादीत गेल्या अनेक दिवसापासून गटबाजीने थैमान घातले असून ज्येष्ठां विरोधात युवा असा संघर्ष पेटला आहे. अनेक युवा पदाधिकारी देखील ज्येष्ठांचा सोबत गेल्याने महानगराध्यक्ष अभिषेक पाटील व त्यांच्यासमवेत असलेले इतरत्र पदाधिकारी एकांकी पडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये थेट अजित पवार यांनी भुसावळ येथील जाहीर कार्यक्रमात महा नगराध्यक्षांच्या राजीनाम्याने पक्षाला काही फरक पडत नाही तसेच इतरांनी देखील राजीनामे दिले आहेत याबाबत देखील संघटनेत काहीच फरक पडणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्या सत्रावर भाष्य केले आहे.
खुद्द उपमुख्यमंत्री व जळगाव जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी या विषयाची दखल घेतल्यामुळे यापुढे संघटनात्मक दृष्ट्या राष्ट्रवादी अधिक अलर्ट झाल्याचे या घटनेतून पाहायला मिळत आहे. कालच एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी अभिषेक पाटील यांनी पक्षाची बदनामी करू नये असे देखील ठणकावून सांगितले पक्षांतर्गत बदल हा निश्चित असतो उद्या मला देखील राजीनामा द्यायचे सांगितल्यास पक्षाचा आदेश मानावा लागेल वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार काम करावे लागते असेदेखील त्यांनी नमूद केले.
महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी जेष्ठां च्या त्रासाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे आपल्या राजीनामा पत्रकात म्हटले आहे. यामुळे आणखी या वादाला संघनात्मक दृष्ट्या फोडणी मिळाली आहे. या सोबतच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, अभिषेक पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील बरखास्त झाल्याने पक्ष नेतृत्वाच्या हेच नेमकं जिव्हारी लागल्याचे सांगितले जात आहे.
17 ते 18 महिन्याचा कालावधी मध्ये महानगर अध्यक्ष पद उपभोगण्याची संधी अभिषेक पाटील यांना मिळाली त्यांच्या कार्यकाळातील आलेख पाहता त्यांचा कार्यकाळ यशस्वी ठरला आहे. मात्र संघटनेत झालेले तू.. तू ..मै.. मै .. तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांन सोबत विविध कारणांमुळे झालेली कटुता, यामुळे देखील वरिष्ठ पातळीवर झालेल्या तक्रारी यामुळे त्यांचा राजीनामा झाल्याचे सांगण्यात आले आहे. अभिषेक पाटील यांनी शहरात केलेले संघटन यामुळे शहरात युवा वर्ग अधिक राष्ट्रवादीकडे वळाला होता, संपूर्ण शहराची कार्यकारणी उभारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
राष्ट्रवादी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा प्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक फेरबदल होणार हे निश्चित होते. त्यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांना महानगराध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात येणार असल्याचे आधीच ठरले होते. आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल होणार हे देखील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनीदेखील याबाबत माध्यमांसमोर सांगितले होते. त्यानुसार अभिषेक पाटील यांना प्रदेश स्तरावर स्थान देऊन खडसे समर्थक असलेले अशोक लाडवंजारी यांना महानगराध्यक्ष पदी नियुक्ती केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले आहे. प्रदेश सरचिटणीस पदी अभिषेक पाटील यांना स्थान देण्यात आल्याचे देखील एका राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने राजमुद्रा शी बोलताना सांगितले आहे.