मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणावरून संपूर्ण राज्यात भाजप रान पेटवण्याचा तयारीत आहे, यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापणार आहे.
ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करणार आहे. तशी घोषणा देखील यावेळी भाजप कडून करण्यात आली आहे. सरकारने तात्काळ कारवाई सुरु करावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा असा ईशारा देखील भाजपने यावेळी महाविकास आघाडीला दिला आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय कुटे व टिळेकर बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.
संजय कुटे आणि टिळेकर यांनी सांगितले की, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.