ठाणे राजमुद्रा वृत्तसेवा । ओबीसी आरक्षणावरून भाजप महाविकास आघाडीला घेरण्याचा तयारीत आहे. भाजप नेते निरंजन डावखरे यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, महाविकास आघाडी सरकार ओबीसींचं आरक्षण टिकवू शकलं नाही.तसेच सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात उद्या 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या 15 सप्टेंबर रोजी ठाण्यासह राज्यभरात तालुका पातळीपर्यंत आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी ओबीसींच्या जागा पूर्वी आरक्षित होत्या त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार देण्याबाबत भाजपने आधीच भूमिका जाहीर केली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितलं.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होणार आहे.