शिरुर, पुणे । “तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते परवीन दरेकर यांच्या व्यक्तव्याचा चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. वादांची ही मालिका कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रवीण दरेकर यांनी नेमकं काय वक्तव्य केलं ?
पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये आद्य क्रांतिकारी राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे. सुभेदारांचा पक्ष, कारखानदारांचा पक्ष, बँकावाल्यांचा पक्ष, उद्योगपतींचा पक्ष आहे. मात्र भाजप हा सर्वसामान्यांचा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं प्रवीण दरेकर म्हणाले होते.
दरेकरांच्या बोलण्याला राष्ट्रवादीत सुरु असलेल्या पक्षप्रवेशची पार्श्वभूमी होती. सुप्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत.