प्रतिनिधी / रावेर
राज्यातील १६ आदिवासीबहुल जिल्ह्यासह ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची धुरा बीएएमएस अर्हताधारक वैद्यकीय अधिकारी अविरतपणे सांभाळत आहेत. गट ‘ब’ संवर्गाचे अधिकारी गेल्या १५ ते २० वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून त्यांना त्वरित पदोन्नती द्यावी, अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात अली आहे.
गेल्या १५ ते २० वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी अविरतपणे ग्रामीण, आदिवासी भागात आरोग्य सेवा देत आहेत. कोरोना काळात या अधिकाऱ्यांनी भरीव योगदान देत उत्कृष्टसेवा बजावली. त्यामुळे संसर्ग रोखता आला आहे. या अधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. गट ‘ब’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना गट ‘अ’ संवर्गाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तो पदभार अनेक वर्षांपासून हे अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत. गट “ब” दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवेत पडलेले खंड शासनाने क्षमापित करावे, सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी, या अधिकाऱ्यांना गट अ संवर्गामध्ये पदोन्नती द्यावी अशी मागणी राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्यध्यक्ष डॉ. अरुण कोळी, डॉ. शिवराय पाटील, डॉ अतुल लाडवांजरी, डॉ तुषार मोरे, डॉ शीतल चव्हाण यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासकीय इतर विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळतो. मात्र ३० ते ३५ वर्षे एकाच पदावर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र पदोन्नतीची एकही संधी उपलब्ध नाही. या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळावी.
—डॉ शिवराय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी रावेर..