कराड । राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर ठाकरे फॅमिली असल्याचे बोललं जातंय. सोमवारी अलिबागला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बंगल्यांची पाहणी करणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे निघाले होते. पण सकाळीच त्यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे, सोमय्या यांनी माहिती देताना सांगितले आहे.