(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना कोरोनाच्या गंभीर स्थितीचा आढावा असलेले पत्र पाठवले आहे. फडणवीस यांनी मुंबईतल्या कोरोना परिस्थितीचा या पत्रात उल्लेख केला असून मुंबई मॉडेलवर प्रश्न उपस्थित केलेला आहे. मुंबईत कोरोना आकड्यांची बनवाबनवी सुरू आहे. मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेले 9603 मृत्यू लपवण्यात आले असून आकड्यांची बनवाबनवी हाच मुंबई मॉडेल आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
मुंबई मॉडेल हे बनवाबनवीचे मॉडेल आहे. अशा या बनवाबनवीच्या मॉडेलला देशाला स्वीकारावं लागेल का? हा एक मोठा प्रश्न आहे. असेही ये म्हणाले. या पत्रामध्ये देशातील एकूण रुग्ण संख्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या असा अहवाल देत फडणवीस म्हणाले की
“देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 22 % रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण कोरोना मृत्यू पैकी 31 % मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत, तर 14 % ऍक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्र मधून आहेत. देशात दररोज चार हजार मृत्यू कोरोनामुळे होत असताना त्यातील 850 हे फक्त महाराष्ट्रातील असतात. तर मुंबई दरवर्षी सरासरी 88 हजार मृत्यू होत असतात. यातील 20 हजार 719 मृत्यू वाढले असून केवळ 11 हजार 116 मृत्यू दाखवण्यात आले आहेत. मात्र उर्वरित 9603 कोरोना रुग्णांचा मृत्यू दडवण्यात आलेले आहेत. गेल्या वर्षीचा हा क्रम यावर्षीही तसाच कायम आहे. आता याला महाराष्ट्र मॉडेल म्हणायचं का? आणि स्वीकारायचं का? राज्यातील सरकारला आणि काही माध्यमांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र आहे असे वाटते. आता समजा मुंबईची स्थिती पाहीली तरी चाचण्या कमी, त्यातही रॅपिड अँटिजेनचे प्रमाण अधिक ठेवून एक नवीन मॉडेल तयार करण्यात आले आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू सुद्धा मोठ्या प्रमाणावर लपवले जात आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकार आपलं कौतुक करण्यात व्यस्त आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र यासारख्या भागांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेले असून त्यांना देवाच्या भरवशावर सोडण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील हीच भयावह स्थिती सुधारल्यास केंद्र सरकारच्या संसाधना वरील ताण कमी होईल आणि देशातील कोरोनाचा लढा अधिक ताकदीने लढता येईल” असे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.