कल्याण राजमुद्रा वृत्तसेवा : राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा सामना चांगलाच रंगला आहे. किरीट सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात 100 कोटीचा दावा दाखल केलाय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चक्क सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलंय. त्याला पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेबाबत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राऊतांना मोलाचा सल्ला दिला आहे.
राज्यात सध्या आरोप प्रत्यारोगाचे राजकारण सुरू आहे. संजय राऊत हे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहेत, त्यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उलट सुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. सजंय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत. खासदार, प्रवक्ते आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी असे चूकीचे आरोप करून वेळ घालवू नये, असा सल्ला आठवले यांनी राऊत यांना दिला आहे.
दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये, तसंच महाविकास आघाडी अंतर्गत ‘खंजिर वॉर’ पाहायला मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पाठीत खंजिर खुपसल्याचा आरोप केला होता. तर शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनीही रायगडमधील एका भाषणात पवारांवर हल्ला चढवलाय. गिते यांच्या या आरोपांवर बोलताना रामदास आठवले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेसच्या नाही तर काँग्रेसनंच पवारांच्या पाठीत खंजिर खुपसल्याचं वक्तव्य आठवले यांनी केलंय. ते आज कल्याणमध्ये बोलत होते.
अनंत गिते यांनी पवारांवर केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारलं असता 1998 साली शरद पवार यांच्यासोबत होतो. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजिर खुपसला नाही. उलट काँग्रेसनंच शरद पवारांच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. त्यामुळे गिते यांचा आरोप चुकीचा असल्याचं आठवले म्हणाले.
आठवले यांनी काल शिवसेनेलाही मोठं आवाहन केलं होतं. शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहण्यातं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवत मुंबई आणि राज्याचा विकास करावा. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला पाहिजे. ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे, असं मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.