धुळे राजमुद्रा वृत्तसेवा : एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा एमआयएमतर्फे आमदार फारुक शाह यांच्या नेत्वृत्वाखाली बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चाला बंदी असताना तो काढल्याने आमदार शाह यांच्यासह 48 कार्यकर्त्यांना क्युमाईन क्लबजवळ शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना पोलिस ठाण्यात आणले.
याबाबत आमदार शाह यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की काही समाजकंटकांनी मंगळवारी एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील अशोक रोडवरील निवासस्थानी निदर्शने, तोडफोड केली. आंदोलकांनी ओवेसी यांच्या घराबाहेरील नामफलक, दिवा आणि खिडकीच्या काचाही फोडल्या. यावेळी खासदार ओवेसी निवासस्थानी उपस्थित नव्हते. घरावरील हल्ल्यानंतर खासदार ओवेसी यांनी या प्रकाराला भाजप जबाबदार असल्याचे म्हटले आहे. खासदार ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या भ्याड हल्ल्याचा एमआयएम पक्षाने तीव्र निषेध केला आहे. अशा प्रकारे भ्याड हल्ला करणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही आमदार फारुक शाह यांनी केली आहे.
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात शासन-प्रशासनाने जमावबंदीचा दिलेला आदेश अद्याप कायम आहे. प्रशासनाला निवेदन द्यायचे झाल्यास पाच व्यक्तींनाच परवानगी आहे. तरीही मोर्चा काढत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांसह आमदार शाह जात असतानाच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी आ.शाह यांच्यासह 48 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यानंतर आ.शाह यांनी पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांना निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्यात.