मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : राज्यातील सिनेमा आणि नाट्यगृहे सुरू करण्यासाठी आता शिवसेना नेते संजय राऊत स्वत: मैदानात उतरले आहेत. थिअटर सुरू झाले पाहिजेत. त्यावर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. विमानापासून रेल्वे आणि हॉटेल्सही सुरू झाल्या आहेत. त्यामुळे थिअटर सुरू व्हावेत, त्यासाठी मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली आहे. महाराष्ट्र सोडून सर्व राज्यात थिअटर सुरू झाली आहे. 85 टक्के कॅपेसिटीने एअरलाईनस् सुरू आहे. रेल्वे सुरू आहे. रेस्टॉरंट सुरू आहे. त्यामुळे थिअटर मालकांना थिअटर सुरू व्हावं असं वाटतं. काल आम्ही भेटलो. चर्चा केली. दोन वर्षांपासून बंद आहे. हजारो लाखो लोकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती करण्याचं ठरलं. मुंबई फिल्म उद्योगाची जनक आहे. इथेच सर्व ठप्प झाल्याने मोठ मोठे कलाकार, दिग्दर्शक, टेक्निशियन आणि इतर कर्मचारी थिअटरमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यात मोठं भांडवल अडकलेलं आहे. या सर्वांचा मुख्यमंत्री गांभीर्याने विचार करतील अशी खात्री आहे. या सर्वांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं राऊत म्हणाले.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या दोन्ही नेत्याली वाद विकोपाला जाणार नाही. दोन्ही महाविकास आघाडीचे नेते आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. भुजबळ ज्येष्ठ आहेत. त्यांनी या सर्व आमदारांना मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. जसा पंकज, जसा समीर तसा सुहास कांदे. तरुण मुलं आहेत. सांभाळून घेतलं पाहिजे. यात कुठे चढाओढ अहंकार असता कामा नये. तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील, असं राऊत म्हणाले.
महिला अत्याचारांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरही राऊत बोलले. सुधीर भाऊ खूप संवेदनशील आहेत. मला माहीत आहे. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. आपल्या राज्यात महिलांवर अत्याचार व्हावेत असं कोणत्या सरकारला वाटतं? रावणालाही वाटत नसेल. रावणानेही सीतेवर अत्याचार केला नव्हता. सीतेला पळून नेलं. पण सन्मानाने सीतेला अशोक वनात ठेवलं. ही या भूमीची परंपरा आहे. इथे आपण स्त्रियांचा सन्मान राखतो. वाईट प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करतो. महाराष्ट्रात महिलांचा नेहमीच सन्मान राखला गेला आहे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी कठोर पावलं टाकली आहेत. हे सर्वांना माहीत आहे. सुधीर भाऊंनाही माहीत आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील आहे, असं ते म्हणाले.