(राजमुद्रा वृत्तसेवा) गेल्या 28 दिवसांपासून अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे आज पहाटे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. सातव यांना 19 एप्रिल रोजी कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. 22 एप्रिलला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 23 एप्रिल पासून राजीव सातव अतिदक्षता विभागात होते, मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना 28 एप्रिल पासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे उपचारादरम्यान राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 47 वर्षांचे होते.
राजीव सातव हे गेल्यावर्षी राज्यसभा निवडणुकांमधून खासदार पदी निवडून आले होते. सातव यांचा आधीपासूनचा राजकीय अभ्यास पक्का होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते. काँग्रेसच्या कार्यकारी समितीवरही नियंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2010 ते 14 या काळात भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांनी उत्तम भूमिका निभावली आहे. 2014 मध्ये हिंगोलीतून ते खासदार म्हणून निवडून आले. राजीव सातव यांना सलग चार वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
राजीव सातव यांच्या मृत्यूनंतर अभ्यासू कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला नेता हरवल्याचा प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रामध्ये व्यक्त केल्या जात आहेत. आपण एक चांगला मित्र हरवला अशी भावना राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर वरून व्यक्त केली.