शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांची मागणी
शिंदखेडा (प्रतिनिधी) : कोरोना महामारीने भारतासह संपूर्ण जगात हाहाकार माजविलेला असून त्यात आपल्या धुळे जिल्हा अपवाद कसा असू शकतो. धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोविडचे रुग्ण आढळुन येत आहेत. धुळे जिल्ह्यात आजपर्यंत सरकारी आकडेवारीनुसार 556 लोकांनी प्राण गमावले आहेत. रोजच्या रोज 500 पेक्षा जास्त रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळुन येत आहेत.
धुळे शहरामध्ये जिल्हा रुग्णालय, हिरे मेडीकल, महानगरपालिका रुग्णालय, जवाहर मेडीकल फाऊंडेशनसह अनेक नामांकित खाजगी हॉस्पिटल आहेत. शिरपूरलाही वैद्यकिय सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहे. परंतु धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका हा वैद्यकीय सुविधेबाबत बराच मागासलेला आहे. शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालय व शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालय आहेत. परंतु त्यांचेकडेही मोजक्याच सुविधा उपलब्ध आहेत. शिंदखेडा येथे तर कुठलीही सोय नाही. शिंदखेडा तालुक्यातील जनतेने कोविड महामारीत जायचे कुठे? अशी अवस्था झालेली आहे. एकतर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय किंवा शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय किंवा खाजगी डॉक्टर याशिवाय पर्याय नाही. शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे आशेचा किरण फक्त दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय असल्याने शिंदखेडा तालुक्यातील रुग्ण दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात जात आहेत.
मा.पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार साहेबांनी नुकतीच दोंडाईचा येथे कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बैठक घेवून दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाला मार्गदर्शक सूचना करुन वैद्यकीय अधिकारी श्री.डॉ.चत्रे यांचे जागेवर डॉ.काटे यांची नियुक्ती केली. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील कारभार थोडाफार प्रमाणात सुधारला देखील. दोंडाईचा रुग्णालया संदर्भात अनेक तक्रारी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांचेकडे आले नंतर काल त्यांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट दिली व समस्या ऐकून घेतली. यावेळी त्यांचेसोबत उपजिल्हासंघटक कल्याण बागल, युवातालुकाधिकारी आकाश कोळी, उपजिल्हायुवाधिकारी गणेश परदेशी, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, विजय वाडीले, आबा चित्ते आदी उपस्थित होते.
यावेळी अनेक नागरिकांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी केल्या. परंतु श्री. हेमंत साळुंके यांनी रुग्णालयात आलेल्या रेमडेसिवीरचे इंजेक्शन व वापर याबाबतीत डॉ.काटे यांचेशी चर्चा केल्यानंतर समाधान झाले. परंतु एका बाजुला धुळे जिल्ह्यात व्हेंटीलेटर अभावी रुग्ण दगावत असतांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून पाच व्हेंटीलेटर मिळालेले असुन देखील आजपावेतो त्याचा वापर सुरु झालेला नाही. व्हेंटीलेटर वापरासाठी लागणारे तज्ञ डॉक्टर व कर्मचारी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित असतांना व्हेंटीलेटरचा वापर का सुरु झाला नाही ? दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटीलेटर सुरु झाले असते तर अनेकांचे प्राण वाचले असते. या दिरंगाईला जबाबदार कोण ? याची चौकशी होऊन संबंधितांना कडक शासन झाले पाहिजे. याप्रकरणी म. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून ताबडतोब दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटीलेटर कार्यान्वीत करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी पत्रकान्वये म.जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.