(राजमुद्रा वृत्तसेवा) तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला धडक दिली असून समुद्रात मोठ्याप्रमाणावर मोठमोठाल्या लाटा उसळू लागल्या आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर सोसाट्याचा वारा वाहत असून वादळासह मुसळधार पावसाळा सुरुवात झाली आहे. निसर्गाचे हे रौद्र रूप पाहून गोवा प्रशासन हादरले असून त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत.
सोलापूर कोल्हापूरसह मुंबई पालघर ठाण्याला चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर अलर्ट करण्यात आले असून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांना देखील किनारी भागापासून इतरत्र रुग्णालयात हालवण्यात आले आहे. मुंबईतून मोठ्या गतीने तौक्ते चक्रीवादळ जाण्याची शक्यता आहे.
दादरा नगर हवेली, दमन दीव आदी समुद्र किनाऱ्यावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. येथून हे चक्रीवादळ मोठे तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. 18 मेच्या दुपारी पोरबंदर, गुजरातचे तट पार करण्याची शक्यता आहे.
गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढून 18 मेच्या संध्याकाळपर्यंत ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या घडामोडी लक्षात घेता आता महाराष्ट्रासाठी इशाऱ्याची तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अद्ययावत पूर्वानुमानानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी ‘ऑरेंज अॅलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.