मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा।लोकप्रतिनिधींना फोडून भाजपने गोव्यात सत्तेचा “खो खो’ सुरू केला आहे. जनतेला थापा मारून त्यांची फसवणूक केली जात आहे, असा घणाघात हल्ला संजय राऊत यांनी भाजपवर चढविला आहे गोव्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलेलं आहे. राजकीय पक्ष यानिमित्ताने कामाला लावले आहे. यातच शिवसेनेने गोव्यात हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
संजय राऊत यांनी आधी ‘सामना’च्या अग्रलेखातून गोव्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केलं आहे. लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो खोचा खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे. जे निवडून आले आहेत ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जात आहेत त्यांना लाज नाही असं म्हणत राऊत यांनी काँग्रेस आणि भाजपवर शरसंधान साधलं.
पक्ष निवडणूक २२ जागांवर लढणार
गोव्यात पक्ष फोडले जातात आणि सत्ता हस्तगत केली जाते. महाराट्रात आम्ही पक्ष फोडले नाहीत तर आम्ही तीन पक्ष एकत्र आलो, अस राऊत म्हणाले. गोव्यात आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेची गोव्यात ताकत आहे. आम्ही 22 जागा लढवणार आहोत. गोव्याच सरकार रोज नवीन थापा मारत आहे. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हौदोस घातला आहे. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप सत्तेवर आला. आता ते त्यांच समर्थन करत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. भाजपने स्वबळावर 25 जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसे काहीच झाले नाही. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे.
कोविड काळात तर सरकारने स्वतःलाच ‘मृत’ घोषित केल्याने गावागावांत कोरोनाने कहर केला व त्यात लोकांचे बळी गेले. गोव्यातील आरोग्य व्यवस्था साफ कोलमडून पडली आहे. सरकारातले मंत्री व त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्त इस्टेटी विकत घेण्यात मशगूल आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत.