(राजमुद्रा वृत्तसेवा) देशातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर हलाखीची परिस्थिती असताना कोणताही मोठा कार्यक्रम करण्यास शासकीय बंदी आहे. या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा सोमवारी 17 मे रोजी असणारा वाढदिवस साजरा केला जाणार नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कोरोनामुळे सध्या परिस्थिती फार बिकट झालेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता सर्व जनतेला तसेच कार्यकर्त्यांना माध्यमांच्या आधारे हे आवाहन करण्यात आले असून गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी न करण्याची ही विनंती करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे फलक अथवा जाहिराती न लावता कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी असेही यावेळी सांगण्यात आले. जर कुणालाही खर्च करण्याची अपेक्षा असेल तर त्यांनी हा खर्च रुग्णांसाठी वापरून सामाजिक कामांमध्ये सेवा देऊन खारीचा वाटा उचलावा असेही चंद्रकांत बाविस्कर यांनी सुचवले.
सोमवारी 17 मे रोजी माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस असून कोरोना परिस्थितीत शासकीय नियमांचे उल्लंघन होणार नाही व कोरोना परिस्थितीत निर्माण झालेली दुःखद परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे दिसत आहे.