मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपालांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या चालवल्या जात आहे. त्यावरून नवाब मलिक यांनी जोरदार प्रहार केला आहे. राज्यपाल भवन हे राजकीय अड्डा झाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटत असतात. राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतोय हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचं दुमत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या या दौऱ्यावरील सरकारची नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांचा हिंगोली, परभणी आणि नांदेडमध्ये दौरा आहे. या तीन पैकी दोन जिल्ह्यात राज्यपाल विद्यापीठातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्याला आमचा आक्षेप नाही. मात्र या तिन्ही जिल्ह्यात ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा घेणार आहेत. त्याला आमचा विरोध आहे. हा सरकारच्या कामात हस्तक्षेप आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
विद्यापीठातील कार्यक्रमावर आक्षेप नाही. मात्र, उद्घाटन आणि प्रशासनासोबतच्या बैठकींवर राज्य मंत्रीमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या बैठका म्हणजे राज्यात दोन वेगळी सत्ताकेंद्र निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तसंच राज्याच्या मुख्य सचिवांना राज्यपालांच्या सचिवांना याबाबत अवगत करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार राज्याचे मुख्य सचिव राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतील. राज्यपालांच्या दौऱ्यात राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा आणली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.