जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातून अग्रवाल चौकात जाणाऱ्या महामार्गाचे काम सध्या सुरू असून, अग्रवाल हाॅस्पिटलसमाेरील चाैकात महामार्गावर नाल्याचे सदाेष बांधकाम करण्यात आले आहे. या नाल्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. याबाबत जळगाव फर्स्टचे डाॅ. राधेश्याम चाैधरी व परिसरातील नागरिकांनी महामार्गावर येऊन नाल्याबाबतची अडचण प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तसेच यासंदर्भांत जळगाव फास्ट जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
अग्रवाल हाॅस्पिटल समाेरील चाैकात अंडरपासचे काम सुरू आहे. आधीच्या अंडरपासचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगावकरांच्या मागणीनुसार शेजारीच दुसरा एक अंडरपास तयार केला जाताे आहे. या अंडरपासजवळून रस्ता ओलांडून जाणारा नाला मध्येच दाेन ठिकाणी काटकाेनात जाेडण्यात आला आहे. आधीच्या नाल्यापेक्षा नव्याने केलेला नाला खाेल आहे. त्यामुळे येथे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढणार आहे. नाल्याचा तळ हा नव्याने बनवलेल्या ड्रेनेजपेक्षा किमान दीड फूट खोल आहे. या नाल्याचा प्रवाह नवीन ड्रेनेजमधे काटकोनात जोडला आहे. तसेच पुढे जाऊन तो प्रवाह समोरील प्रवाहाबरोबर पुन्हा काटकोनातून मुख्य नाल्यात पुलाखालून जोडला आहे. नवीन ड्रेनेज मुख्य रस्त्यापासून समांतर रस्त्याच्या मधोमध जमिनीच्या स्तरापासून अडीच ते तीन फूट उंच आहे. त्यामुळे नऊ मीटरचा समांतर-सेवा रस्ता दुभागून ४-५ मीटर एवढाच उरतो. भविष्यातील अडचण लक्षात घेऊन या नाल्याबाबत नागरिकांच्या सूचनांनुसार सुधारणा करण्याची मागणी जळगाव फर्स्टचे समन्वयक डाॅ.राधेश्याम चाैधरी यांनी केली अाहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तांत्रिक पुराव्यासह लेखी तक्रार करणार असल्याचे डाॅ. चाैधरी यांनी म्हटले आहे या वेळी स्थानिक रहिवासी भरत अमळकर, डाॅ. मिलिंद काेल्हे, डाॅ. प्रशांत साठे, दीपक परदेशी, नितीन पाटील, अमित भाटिया उपस्थित हाेते.