मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवत आहेत.
अतुल देऊळगावकर म्हणाले, “जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्यावेळेलाच महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करु नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे. आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केलं जातं. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केलं जातं. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे”
मराठवाड्यात आलेला पूर जलयुक्त शिवार योजनेमुळे आला असं म्हणता येणार नाही, मात्र पूर येण्याला जलयुक्त शिवार योजना हे एक कारण आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामं चुकीच्या पद्धतीने झाली. अतिखोलीकरण ,रुंदीकरण यामुळे कामात तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणावर झाल्या. मी आधीपासूनच या कामांवर आक्षेप घेतला होता. मात्र सरकारने केलेल्या चुकांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं प्रदीप पुरंदरे म्हणाले.