नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा । मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि प्रत्येकाला प्रत्येकी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज यांच्या या मागणीवर टीका केली आहे. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
गुलाबराव पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, असं पाटील म्हणाले. मागणी करणं सोपं आहे. पण निर्णय पंचनाम्यानंतरच घेतला जाईल. प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती पाहून ओला दुष्काळ जाहीर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात 3500 हेक्टर केळीचं नुकसान झालं आहे. अनेक घरं आणि शेतजमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासाठी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येकाचा पिकपेरा वेगळा असल्याने सरसकट मदत करता येणार नाही. पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत. म्हणजेच ओला दुष्काळ म्हणून सरकारने या अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. कॅबिनेटमध्ये पूर्ण माहिती आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीसाठी केंद्राने मदत देण्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशा संकटाच्याकाळात केंद्र सरकारने राज्याला पैसे द्यायला हवे. मात्र, केंद्र काही मदत देत नाही, असं ते म्हणाले.