मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । मुंबईत निर्माण झालेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महापालिका आणि शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ही टीका करतानाच शेलार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवरही हल्ला चढवला आहे. सुप्रियाताई, ‘सेल्फी विथ् खड्डे’ कार्यक्रम आता कुठे गेला?, असा सवालच आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे. तसेच, मुंबईत गेल्या 25 वर्षांमध्ये रस्त्यांवर 21 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. कंत्राटदाराला महामार्ग मिळाला. मुंबईकरांच्या रस्त्यांचे “रस्ते” लागले, अशी टीकाही त्यांनी केली.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन खड्ड्यांच्या मुद्दयावरून शिवसेनेची पोलखोल करतानाच सेनेला धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी काल केलेले विधान हे भाषणातील वाक्याप्रमाणे आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातले रस्ते ज्या विविध एजन्सीच्या अंतर्गत येतात त्या सगळ्या एजन्सीची बैठक घेतली असती तर आम्हाला पटलं असतं. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या तरी कंत्राटदारावर कारवाई केली असती तर आमचा विश्वास बसला असता. खड्डे बुजवण्यासाठी वापरात येणाऱ्या मालाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली असतील तर खरे वाटले असते. त्यामुळे खड्ड्याबाबत जी बैठक झाली तो सेल्फी विथ खड्डे सारखा दिखाऊपणा होता, अशी टीका शेलार यांनी केली.
मुंबईत गेल्या 25 वर्षांमध्ये रस्त्यांवर 21 हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. कंत्राटदाराला महामार्ग मिळाला. मुंबईकरांच्या रस्त्यांचे “रस्ते” लागले. केवळ या वर्षी प्रत्येक वॉर्डात 2 कोटींप्रमाणे 48 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी खर्च होणार आहेत. महापालिकेचे पोर्टल सांगते, मुंबईत 927 खड्डे आहेत. महापौर म्हणतात, आम्ही 42000 खड्डे बुजवले. कंत्राटदाराला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून बनवाबनवी सुरु आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कंत्राटदाराच्या समर्थनाचे आकडे किंवा त्याच्या समर्थनाच्या भूमिका शिवसेना का घेते आहे? मुख्यमंत्री महोदय म्हणतात कंत्राटदारांवर कारवाई करा. गेल्या वर्षभरात महापालिकेने अशी एकदा तरी कारवाई केली का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.