(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) नुकत्याच काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी जळगाव दौरा करून पक्षाची आढावा बैठक पार पडली. या ठिकाणी बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या समस्यांचा पेटारा घेऊन मोठ्या प्रमाणावर निमोल्लंघन करत उपस्थितही होते. प्रणिती ताई शिंदे यांनी या आढावा बैठकीत जिल्ह्याचे कामकाज जाणून घेतले. त्यासाठी व्यक्तिगत रित्या आपल्या VIP कक्षात महत्त्वपूर्ण चर्चाही केल्या. आता या फक्त चर्चाच झाल्या आहेत की मुळात यावर पुढे जाऊन काहीतरी अंमलबजावणी होईल असा संभ्रम निर्माण होत आहे.
जिल्ह्यात काँग्रेसच्या समस्या इतर पक्ष्यांपेक्षा अधिक असल्याचे सहज दिसून येते. उमेदवारी देण्यावरून कार्यकर्त्यांनी आपापल्या तक्रारी प्रणिती शिंदे यांच्या समोर मांडल्या आहेत. जिल्ह्यातील बरीच पदे ही ‘या ना त्या’ कारणामुळे रिक्त राहिलेली आहेत. आता ही रिक्त पदे या वेळी पदांसाठी असलेली गोंधळाची आणि स्पर्धेची परिस्थिती पाहता खरंच भरली जातील का? आणि तेही येत्या आठ दिवसात? या बाबत जरा प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपली गार्हाणी मांडली खरी मात्र गटबाजीचे राजकारण पाहता आधीच पिछाडीवर असलेलं जिल्हा काँग्रेस हे आपल्या जुन्या वादांच्या भोवऱ्यातुन निघाले तरच पुढे जाऊन काहीतरी करण्यासारखे काँग्रेसकडे उरेल यावर पक्षाने विचार करण्याची गरज आहे.
पदांच्या रिक्ततेवर विचार करायचा झाल्यास मुळात योग्य संघटन आणि सुयोग्य कार्यकर्त्यांची कमतरता असलेल्या काँग्रेस पक्षात नवे कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते यांच्यात स्पर्धा दिसून येते. त्यातल्यात्यात जुन्या गटाचे जिल्हा काँग्रेसवर असलेले वर्चस्व हे नव्यांची घुसमट करते की काय असा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. स्थानिक काँग्रेसची नाराजी सध्या अधिकारीपणामुळे व्यक्त होत असताना दिसत आहे. कारण जिल्हाध्यक्ष बदलासाठी एका विशिष्ट गटाकडून मोठ्या प्रमाणावर हालचाली आणि शर्तीचे प्रयत्न चालू आहेत मात्र वरिष्ठ स्तरावर या गटाची मुस्कटदाबी करून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. त्यामुळेच ही महत्वाची पदे आजच्या घडीलाही रिक्त असून आपलं अस्तित्व सतत दाखवून देत आहे. खरंतर प्रणिती शिंदे या सुद्धा जबाबदारी मिळाल्यानंतरच जळगाव जिल्ह्याचा हाल हवाला घ्यायला जळगाव आल्यात. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या जुन्या समस्यांच्या सततच्या केल्या जाणाऱ्या तक्रारी आजवर किती वेळा विचारात घेतल्या गेल्या आहेत हा सवाल आजही अनुत्तरित आहे.
वास्तविक पाहता काँग्रेसला एकत्र ठेवून काँग्रेसची बाजू मजबूत करणारा एकही प्रमुख नेता नसल्याने काँग्रेस आजही जिल्ह्यातला दुर्लक्षित घटकाकडे वाटचाल करणारा पक्ष म्हणून विचारात घेतला जातो. कारण जिल्ह्यातील प्रत्येक गट आपापल्या गटाचे काँग्रेसमध्ये वलय निर्माण करून ते वाढवण्याचा प्रयत्न दिसून येतो आणि याच बिनबुडाच्या प्रयत्नांच्या पराकाष्टा त्यामुळे आजही काँग्रेस बदनामीचे कारण ठरत असल्याचे दिसून येते. या पक्षाला खरंतर आपापसातील मतभेद डावलून पक्षाला आधार देऊन स्थिर करावं लागेल. त्यानंतर मग हवं तर काँग्रेसी राजकारण करायला हरकत नाही.