रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | अतिवृष्टी व वादळामुळे शेतजाऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आलेला शेतकरी या अस्मानी संकटामुळे आणखीनच हतबल झाला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने धीर देण्यासाठी वादळ, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा. तसेच कोरडवाहू शेतीला एकरी ५० तर बागायती शेतीला एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी भाजपने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानिपोटी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, कोरडवाहू व बागायती शेतीला आर्थिक मदत जाहीर करावी,२०१९-२० ता वर्षातील नुकसानीची विमा रक्कम त्वरित मिळावी, विजेचे ट्रान्सफॉर्मर देतांना शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, संपूर्ण कर्जमाफी करावी या मागण्या भाजपने निवेदनाद्वारे केल्या आहेत. भाजपचे किसान सेलचे प्रमुख सुरेश धनके, किसान सेलचे तालुकाध्यक्ष राहुल महाजन, तालुका सरचिटणीस सी एस पाटील, हरलाल कोळी,एड सूर्यकांत देशमुख, राजेंद्र पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी निवेदन स्वीकारले