(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या कोरणामुळे झालेल्या निधनानंतर विविध स्तरावरून शोक व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या नेत्याला आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
“राजीव सातव यांनी आपल्या प्रांजळ स्वभावाने पक्ष, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मित्र जोडले होते. संसदीय प्रणालीवर दृढ विश्वास असणारे आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जात असे. त्यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबावर, पक्षावर मोठा आघात आहे, तो सहन करण्याची शक्ती सातव कुटुंबियांना मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खासदार राजीव सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही राजीव सातव यांच्या निधनाबद्दल आपल्या भावना मोकळ्या केल्या.
“तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. श्री.सातव कोरोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दु:खद बातमी आली. श्री.सातव यांचेकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेला नेता आपल्यातून हिरावून नेला आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो” असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.