बीड राजमुद्रा वृत्तसेवा । देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावानं राज्यातील वृद्धांसाठी आरोग्य योजना प्रस्तावित आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, अशी घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार बळावतात. त्यासाठी त्यांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज असते. या सगळ्यांसाठी हजारो रुपयांची आवश्यकता असते. मात्र अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणं त्यांना शक्य होत नाही. असा सगळा विचार करुन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावाने आरोग्य योजना शरद शतम: योजना प्रस्तावित आहे.
जेष्ठ नागरिकांवर आधुनिक राहणीमानाचा ताण पडत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचाही त्यांना सामना करावा लागत आहे. वेळोवेळी आरोग्य तपासण्या न करता आल्यामुळे विविध आजार शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात. त्यामुळे उपचारास विलंब होतो व रुग्ण दगावण्याचा धोका असतो. या सर्व बाबींचा विचार करुन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच योजना सुरु करण्याचा निर्णय याअगोदर घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.