मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । ईडी चौकशी आणि पर्यायाने संभाव्य अटक टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या नेतेमंडळींचा आटापिटा सुरू आहे. शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ आजारी असल्याने त्यांना गुरुवारी ईडी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चाैकशी करण्यासाठी समन्स बजावताच नेते न्यायालयाची पायरी चढत आहेत, मग चौकशी कशी करायची, असा सवाल ईडीच्या वकिलांनी अडसूळ यांच्या याचिकेवरील सुनावणीप्रसंगी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग हेच आता पोलिस चौकशी टाळण्यासाठी रशियाला पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग हे अटकेच्या भीतीने देश सोडून रशियाला पळाल्याचा संशय एनआयए, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए तपास करत असून परमबीर यांच्यावर महाराष्ट्रात विविध पोलिस स्टेशनमध्ये अॅट्राॅसिटी व खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर एकदा एनआयए ऑफिसला आले होते. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाने परमबीर यांना अनेकदा समन्स पाठवले आहे. परंतु ते समन्सही सिंग यांना मिळालेले नाही. अँटालिया स्फोट प्रकरणी परमबीर यांची १७ मार्च रोजी बदली झाली. होमगार्ड महासंचालक पदाचा त्यांनी २२ मार्चला पदभार स्वीकारला. ४ मे पासून ते रुजू होणार होते. मात्र त्यांनी वैद्यकीय रजा टाकली. वेळोवेळी रजा त्यांनी वाढवून घेतली. अलिकडेच त्यांनी २९ आॅगस्टपर्यंत रजा वाढवून घेतली होती. परमबीर हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ३२ वर्षे त्यांनी महाराष्ट्रात सेवा बजावली आहे. अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी चांदीवाल आयोग करत आहे. या आयोगाने चार वेळा परमबीर यांना समन्स पाठवली आहेत. अटक वाॅरंटही काढलेले आहे. चंदीगढ, रोहतक व मुंबईतील घरी त्यांना संपर्क करण्यात तपास यंत्रणांनी प्रयत्न केला. सध्या त्यांचा मोबाइल बंद आहे.एनआयएने दाखल केलेल्या अँटिलिया स्फोटक प्रकरणाच्या आरोपपत्रात परमबीर यांच्यावर आरोप नाही. मात्र विविध पाच गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिस त्यांना कधीही अटक करण्याची शक्यता आहे. त्या भितीने परमबीर युरोपातील देशात लपले असावेत, असा कयास वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा तपास यंत्रणांना मिळालेला नाही.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याभोवती रुग्णालयातही ईडीचा खडा पहारा आहे. गुरुवारी दुपारी अडसूळ यांना लाइफलाइन रुग्णालयातून गोरेगाव येथील एसव्हीएस रुग्णालयात हलवले आहे. सोबत कुटुंबीय आणि काही ईडीचे अधिकारी उपस्थित होते. २७ सप्टेंबर रोजी अडसूळ यांना ताब्यात घेण्यासाठी ईडीचे पथक त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी गेले. मात्र त्याच वेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना गोरेगावच्या लाइफलाइन केअरमध्ये भरती केले होते. आयसीयूमध्ये ४ दिवस उपचार करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना गुरुवारी एसव्हीएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अडसूळ यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारीदेखील आहेत. आज दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेताना ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबतच होते. अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी तातडीने सुनावणी करण्यात आली. याचिकाकर्ता वयस्कर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानासुद्धा ईडीचे अधिकारी रुग्णालयाबाहेर ताबा घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेले उपचार लक्षात घेता त्यांना अटक करू नये, अशी मागणी अडसूळ यांच्या वकिलांनी केली.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यामागे देखील किडीचा ससेमिरा सुरू असून त्यांचे जावई गिरीश चौधरी हे कोठडीत आहे अद्याप पर्यंत त्यांचा जामीनावर सुटका झालेली नाही, गेल्या दोन दिवसापूर्वी देखील खडसे हे अज्ञातवासात गेले अशी राजकीय चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती, मात्र आज बोदवड येथे कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधत बीएचआर प्रकरणामुळे माझ्यामागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला असा आरोप केला आहे. यामुळे बीएचआर प्रकरण तसेच खडसे यांच्या मागे लागलेली ईडी प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.