पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । शिरुर परिसराच्या विकास कामांसाठी येत्या मार्च अखेरपर्यंत एकूण 25 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. शिरुरच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शिरुर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, नगराध्यक्ष वैशाली वाखारे आदी उपस्थित होते.
नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत शिरुरच्या वैभवात भर घालणारी वास्तू आहे. या इमारतीमधून कोणत्याही नागरिकांवर अन्याय होऊ न देता लोकाभिमुख, पारदर्शक कामे व्हावीत. प्रत्येक निर्णय शहराचा विकासाला चालना देणारा असला पाहिजे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेवून शिरुरनगरीचा विकास करावा, अशी अपेक्षा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलीय.