(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्याप्रमाणे हे चक्रीवादळ आता गोव्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड असा प्रवास करत मुंबईत पोहोचले आहे. हे वादळ सायंकाळपर्यंत गुजरातमध्ये पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वादळ भयानक रुप धारण करण्याची शक्यता लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे-वरळी सी लिंक हा महत्वाचा मार्ग बंद ठेण्यात येणार आहे. तर मुंबईतील मोनोची सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी सांगितले की हे वादळ तीव्र चक्रीय वादळात रूपांतरित झाले असून यापूर्वी या वादळाच्या भयानक रुपाची कोणतीही कल्पना केली नव्हती. हवामान खात्याने सांगितले की, पूर्व मध्य अरबी समुद्रावरील अति तीव्र चक्रीवादळ वादळ गेल्या सहा तासांत सुमारे 20 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आहे आणि आता ते चक्रीय वादळामध्ये बदलले आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकाकेडून सांगण्यात आले की, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-वरळी सी लिंक पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्यात आला आहे. बीएमसीने लोकांना इतर मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे. त्याचवेळी मुंबईतील मोनो रेल सेवाही बंद करण्यात आली आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आला आहे. येथील विमानतळावरील कामकाज दुपारपासून थांबविण्यात आले आहे. विमानतळ प्राधिकरणाने निवेदन काढून यासंदर्भात माहिती दिली.
केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्टी भागात रविवारी या चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाल्यानंतर चक्रीवादळ उत्तर दिशेने गुजरातच्या दिशेने निघाले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार पाऊस तसेच समुद्राच्या उच्च लाटा उसळत आहेत. तसेच जोरदार पाऊस पडत आहे. या वादळामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो घरांचे नुकसान झाले आहे आणि विद्युत खांब व झाडे उपटून गेली आणि लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले.
वादळामुळे आज मुंबई, उत्तर कोकण, ठाणे आणि पालघरमधील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याच वेळी, मच्छिमारांना समुद्राच्या किनाऱ्यावर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतर महाराष्ट्रातील सर्व 4526 नौका आणि गुजरातच्या 2258 नौका सुरक्षितपणे बंदरांवर पोहोचल्या आहेत. आज मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कालच वादळाने गोवा किनाऱ्यावर धडक दिली, त्यानंतर तेथे वीजपुरवठा खंडीत झाला. वाऱ्याच्या वेगाने वेगाने झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्यामुळे विजेचे खांबही तुटले होते. अनेक भागात वाहतूक कोंडीची परिस्थिती होती. रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली. राज्यात चक्रीवादळाच्या वादळाला सामोरे जाण्याच्या तयारीची माहिती घेतली.
आयएमडीने गुजरात आणि दमण आणि दीव यांना यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीच्या चक्रीवादळ चेतावणी विभागाच्या म्हणण्यानुसार 18 मे पर्यंत ताशी 150 ते 160 किलोमीटर वेगाने वारे वाहत राहतील. गुजरातमधील सखल भागातून दीड लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची 54 पथके तैनात करण्यात आली आहेत.