पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्याने पुन्हा एकदा आपणच सत्तेत येणार असल्याचं सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधकांचं म्हणणं फेटाळून लावलं आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका होणार हे केवळ राजकीय भाष्य आहे. यामध्ये फारसं काही नाही, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
सुनील तटकरे आज पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं. यावेळी त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीवर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही अशा आपत्ती आल्या. मात्र त्यांनाही अशी मदत करता आली नाही. केंद्र सरकारने निकष बदलून राज्याला मदत करावी, असं तटकरे म्हणाले.
शरद पवार आणि नितीन गडकरीमंध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबत चर्चा झाली. आजची बैठक ही फलद्रुप झाली. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न लवकरच निकाली निघेल, असं सांगतानाच शरद पवार आणि नितीन गडकरी एकत्रित प्रवास करत आहेत. यावेळी मराठवाड्यातील नुकसानसंदर्भात चर्चा होऊ शकते. या दोन्ही नेत्यांच्या आजच्या बैठकीत राजकीय काही नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार आणि नितीन गडकरींमध्ये वेगवेगळ्या मुद्यावर चर्चा झाली. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात संदर्भातही चर्चा झाली, विमानतळासमोरची 12 एकर जागा मिळावी आणि कार्गोची तीन एकर जागा मिळण्यासंदर्भात चर्चा झाली. गडकरी हे इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीचे अध्यक्ष आहेत. लवकरचं दिल्लीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल. मी नितीन गडकरींना पत्र दिलंय, असं भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितलं.