मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । ओल्या दुष्काळाबाबत आणि शेतकऱ्यांच्या मदतीबाबत येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत व्हावी, अशी विनंती काँग्रेसकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत द्यावी, तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन केंद्र सरकारकडून मदत मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
विरोधी पक्ष महाराष्ट्रात राजकारण करत आहे. गुजरातला मदत केली जाते महाराष्ट्राला नाही. यात राजकारण होतंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून जास्त मदत आणावी, त्याला राजकारण म्हणणार नाही, त्यांना शाब्बासकी मिळेल, असं नाना पटोले म्हणाले.
काँग्रेसला काय करावं काय नाही हे माहित आहे. संजय राऊत संपादक आहेत. त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. पण हेच मत त्यांनी मोदी सरकारबाबतंही मांडावं, देश बर्बाद होत चालला आहे. देशात महागाई वाढलीय, यावर संजय राऊत यांनी लेख लिहिवा, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.
काँग्रेसला काय करायचं आहे हे काँग्रेसला माहिती आहे. पण संजय राऊत यांना हे सांगू इच्छितो की 2024 मध्ये देशात काँग्रेसचंच सरकार असेल. ते कसं आणायचं हे काँग्रेसला माहिती आहे. तेव्हा कोण सोबत असेल की नाही आत्ताच चर्चा नाही, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.