लखनऊ राजमुद्रा वृत्तसेवा । लखीमपूर खेरी हिंसा प्रकरणानंतर आता यूपीमध्ये समाजवादी पार्टीने कडक भूमिका घेतली आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव हे ठिय्या आंदोलनावर बसले आहे. मात्र त्यांच्या आंदोलनस्थळापासून काहीच अंतरावर एका पोलिसांच्या जिप्सी व्हॅनला आग लावण्यात आली आहे. लखनऊच्या विक्रमादित्य मार्ग परिसरात अखिलेश सध्या ठिय्या आंदोलन करत होते. ही जिप्सी गौतमपल्ली पोलीस ठाण्याबाहेर उभी होती, आतापर्यंत हे कळू शकलेलं नाही की जिप्सीला आग कुणी लावली. आंदोलन करणाऱ्या अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लखनऊच्या विक्रमादित्य मार्ग परिसरातच गौतमपल्ली पोलीस स्टेशन आहे, त्याच्या बाजूलाच सपा अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं घरंही आहे. घराच्या परिसरातच अखिलेश आंदोलन करत होते, तर त्याच्या बाजूलाच असणाऱ्या गौतमपल्ली पोलीस स्टेशनबाहेर उभ्या असलेल्या जिप्सीला आग लागली. लखीमपूर खेरीच्या शेतकरी आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, मंत्र्यांच्याच ताफ्यातील गाड्यांनी शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत.
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खेरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.