मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा । मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प पूर्णत्वात येत असून, राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. रोहिणी खडसे सतत प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे आम्ही सरकार म्हणून या योजनांना प्राधान्याने निधी देऊन पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
तालुक्यातील वढोदा वनक्षेत्राच्या हद्दीतील गोरक्षगंगा नदीवर असलेल्या जोंधनखेडा कुंड धरणाचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसद्वारे तर प्रत्यक्षात धरण स्थळी माजी महसूल, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे – खेवलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू महाजन, सरचिटणीस ईश्वर रहाणे, अशोक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी आणि सांडव्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३० कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल माजी मंत्री खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील, ॲड. रोहिणी खडसे यांचा कुऱ्हा-वढोदा परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील म्हणाले, की ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची गावखेड्यात ताकद वाढली असून, येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व सहकार क्षेत्रातील निवडणुकांत राष्ट्रवादीला यश मिळेल.