नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा । नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांसाठी मंगळवारी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 6 लाख 16 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1115 मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत. पंचायत समित्यांच्या 31 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या सकाळी 7: 30 ते 5:30 पर्यंत मतदान पार पाडणार आहे, यासाठी निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य मतदान केंद्राकडे घेऊन जात आहेत.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर ही निवडणूक होत आहे, त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेत प्रतिष्ठा वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला चांगलाच कस लागणार आहे. डिसेंबर 2019 च्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरुन निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या 16 आणि पंचायत समित्यांच्या 31 सदस्यांचं सदस्यत्व निवडणूक आयोगाने रद्द केलं होतं. ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने आता खुल्या प्रवर्गातून निवडून येण्यासाठी ओबीसी उमेदवारांना चांगलाच कस लागणार आहे.
राष्ट्रवादीने एकत्र लढण्याची घोषणा स्थानिक पातळीवर केली आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी तिरंगी लढत नागपुरात पाहायला मिळेल.