(राजमुद्रा वृत्तसेवा) तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयीन आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाला भेट देऊन वादळाच्या परिस्थितीचा तसेच मदत कार्य आणि बचावकार्याच्या पूर्वतयारीची माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच बरोबर अजित पवार यांनी रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर आदी विभागांच्या जिल्हाधिकारी तसेच मुंबई पालिका आयुक्तांशी संपर्क साधून या विषयावर चर्चाही केली. याबाबतचे वृत्त माध्यमांवर पसरताच भाजप महाराष्ट्राचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत टोला लगावला आहे.
भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत “देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना गिरगाव मांडवाची आग असो वा पावसाने झोडपण्याची घटना असो, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत जागेवरून हलले नव्हते. मात्र आताचे मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार? कोकण, मुंबईवर मोठं संकट आलं आहे. त्यात आधीच कोरोनाचे संकट असतांना मुख्यमंत्री मात्र अजूनही घरातच आहेत. मुख्यमंत्री असा दिलासा कधी देणार?लोकांना वर्क फ्रॉम होम करायला सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच इतकं मनावर घेतलं की राज्यात त्यांच्यासाठी मंत्रालय सुद्धा आहे हे कधी त्यांच्या लक्षात येणार?” असा टोला लगावला आहे. आपल्या ट्विटरवर संदेश लिहून केशव उपाध्ये यांनी टोलेबाजी केली आहे.