जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । १४ एप्रिलपासून सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलातील २२१ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली. ६ डिसेंबर २०२१ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती महावितरणच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यात जळगाव मंडलात १३२, नंदुरबार मंडलात ४८ तर धुळे मंडलात ४१ ग्राहकांना वीज जोडण्या देण्यात आल्या.
योजनेसाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा.आधार कार्ड, रहिवासी दाखला इ. आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीज जोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रांसह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. लाभार्थीस ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एकरकमी जमा करण्याचा अथवा सदर रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ घ्यावा.