नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा । शेतकऱ्यांना जिवंत चिरडणारी लोकं मोकाट आहेत आणि पीडित कुटुंबांच्या भेटीसाठी निघालेली मी पोलिसांच्या ताब्यात आहे, अशा संतप्त भावना व्यक्त करत पोलिस दोषींना अटक कधी करणार?, असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी विचारला आहे. गेल्या 32 ते 35 तासांपासून प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात आहेत. इकडे राहुल गांधींनी प्रियांका गांधींना ट्विटरवरुन धीर दिला आहे. तू लढणारी सच्ची काँग्रेसी आहेस, मागे हटणारी नाहीस. तुझ्या हिमतीला हे घाबरलेत, असं म्हणत राहुल गांधींनी प्रियांका गांधींच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांना धीर दिला आहे.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. यानंतर प्रियांका गांधी लगोलग पीडित कुटुबांच्या भेटीसाठी निघाल्या. परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना लखीमपूरला जाण्यास मनाई करुन त्यांना ताब्यात घेतलं. गेल्या 35 तासांपासून त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.
पोलिसांच्या ताब्यात असल्या तरी ट्विटरवरुन प्रियांका गांधी सरकारला धारदार प्रश्न विचारत आहेत. “नरेंद्र मोदीजी, आपल्या सरकारने मला कोणत्याही एफआयआरशिवाय आणि ऑर्डरशिवाय पाठीमागच्या 32 तासांपासून स्थानबद्ध केलंय. पीडितांच्या भेटीसाठी निघालेल्या व्यक्तीला तुम्ही स्थानबद्ध केलंत आणि ज्यांनी शेतकऱ्यांना जिवंत चिरडलंय ते मोकाट फिरतायत. दोषींवर कारवाई कधी करणार आहात?”, असा सवाल प्रियांका गांधी यांनी ट्विटरवरुन विचारलाय.
प्रियांका गांधींच्या जिगरबाजपणाला राहुल गांधी यांनी दाद दिली आहे तसंच त्यांची हिम्मतही वाढवली आहे. ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात ठेवलंय, ती घाबरत नाही. ती सच्ची काँग्रेसी आहे, कधीच हार मानणार नाही. प्रियांका मला माहिती आहे, तू मागे हटणार नाहीस. न्यायाच्या अहिंसक लढाईत देशाच्या अन्नदात्याला जिंकवल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशातील नरसंहार बघूनही जो शांत आहे, तो अगोदरच मेलेला आहे. पण शेतकऱ्यांच्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, असं ट्विट करुन राहुल गांधी म्हणाले आहेत.