जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करावा. या उत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रमास प्राधान्य देऊन शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेबाबत जनजागृती करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही जाहीर केल्या आहेत.
सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोणातून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक मंडळानी महानगरपालिका/नगरपालिका/स्थानिक स्वराज्य प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत, घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साध्या पध्दतीने करावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता चार फुट व घरगुती मूर्तीची उंची दोन फुटाची मर्यादा असावी. देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातु, संगमरवर आदि मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकार करावा, नागरीकांना जबरदस्ती करु नये. या उत्सावात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शीत करण्यास पसंती द्यावी, यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी या माहिमेची जनजागृती करावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम जसे-रक्तदान शिबिरांचे आयेाजन करण्याचे करावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छतेबाबतही जनजागृती करावी.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी, देवीच्या मंडपात प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत ब्रेक द चेन अंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आरती, भजन, किर्तन आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. मंडपात खाद्यपदार्थ, पेयपानाची व्यवस्था करु नये. देवीच्या आगमन व विसर्जन मिरणवणूका काढू नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी मूर्ती स्वीकृती केंद्राची व्यवस्था करावी. घरगुती व सार्वजनकि नवरात्रौत्सवाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर मूर्ती विर्सजन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई राहील.
या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे पालन करावे. सूचनांचे पालन न केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असेही अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी म्हटले आहे.