सोलापूर राजमुद्रा वृत्तसेवा । ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशा शब्दात खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केलीय.
शरद पवार यांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मरगीचे अश्रू पुसण्याचे काम आहे. एकीकडे शतकऱ्यांना शेतमाल विकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे असा उल्लेख शरद पवारांच्या आत्मचरित्रात आहे. मात्र, करार शेतीचा पहिला प्रयोग 2005 मध्ये शरद पवार यांनी आणला. करार शेतीचा सगळ्यात जास्त फायदा बारामती अॅग्रोला झाला. तिथे उभारलेलं वैभव हे याच कायद्या अंतर्गत आहे. पोट भरल्यानंतर दुसऱ्यानं जेवण करु नये म्हणून ते कडू आहे असा सांगण्यासाखरा प्रकार आहे, असा टोला सदाभाऊ खोत यांनी पवारांना लगावला आहे.
विविध मुद्द्यांवरुन पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. शुगरकेन अॅक्टनुसार ऊस गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. मात्र निती आयोगाला तीन टप्प्यात पैसे देण्याची सूचना केली. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेतला जाणार आहे. सहकार आणि साखर सम्राटांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची माती करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप सदाभाऊंनी केलाय.