जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महामार्गाचे कामे अपूर्ण असतांनाच टोल प्लाझा सुरू करण्यात आला आहे. हा टोल प्लाझा बंद करण्यात यावा अन्यथा मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी ‘आरती आंदोलन’ करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांना निवेदनात दिले आहे.
निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, राष्ट्रीय राजमार्ग क्र. ५३ (जुना राष्ट्रीय राजमार्ग क्र.०६) मधील फागणे ते तरसोद व तरसोद ते चिखली या दरम्यानचे चौपदीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. सदरचे काम चिखली ते तरसोद पर्यंतचे जवळपास पुर्णत्वास आले असले तरी अद्याप या गावांदरम्यानची बरीच कामे अपूर्ण आहेत. तरीही या मार्गाचे नशिराबाद येथे टोल प्लाझा सुरू करून टोल वसूली सुरू आहे. यासंदर्भात वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, तरसोद ते चिखलीदरम्यान नशिराबाद-जळगांव खुर्द उड्डाण पुल, फेकरी रेल्वे उड्डाण पुल, भुसावळ शहरातील रेल्वेवरील उड्डाण पुल, भुसावळ तालुक्यातील निंभोरा-दिपनगर जवळील रस्त्याचे काम, चिखलीपर्यंत जवळपास सात ते आठ ठिकाणी सुरू असलेली एकतर्फी वाहतुक ही सर्व कामे अद्याप अपूर्ण असून काही कामांमध्ये असलेल्या तांत्रिक चुकांचे निराकरण लवकरात लवकर करावे, सदरची पुर्ण कामे झाल्यानंतरच टोल प्लाझा वसूल करावा. सद्यस्थितीत सुरू असलेली टोल वसूली त्वरीत थांबवावी, अन्यथा मंगळवार १२ ऑक्टोबर रोजी टोल नाक्यावर ‘आरती आंदोलन’ करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.