मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. मुंबईला तिसऱ्या लाटेचा कसलाही धोका नाही, असं मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर सेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात घेण्यासंबंधी हालचाली वाढल्या आहेत.
दसरा मेळाव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही. नियम आणि संकेतांचं पालन करुन दसरा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची देखील तीच इच्छा आहे. सध्या यासंबंधी चर्चा सुरु, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील”