(चोपडा राजमुद्रा वृत्तसेवा) शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी कठोरा येथील तापी नदी वरून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन जलवाहिनी विरोधात स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचा विरोध दिसून येत आहे. सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पालिकेला पाणीपुरवठा योजनेसाठी 65 कोटी रुपये मंजूर झाले असून सध्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.
या आधीच तापी वरून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा बाबत पाण्याचा वारेमाप उपसा झाल्यामुळे शहरातील भूजल पातळी अधिक खोलवर गेली आहे. परिणामी भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊन गावातील पाणीपुरवठा आणि शेतीच्या सिंचनावर याचा परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे. नगरपालिकेने नवीन जलवाहिनी टाकण्या संदर्भात ग्रामस्थांची तसेच ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतली नसून तापी नदीवरील जुन्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी अस्तित्वात असताना गावातून ही नवी पाईपलाईन टाकण्याचा हट्ट का केला जात आहे? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
सध्याच्या काळात मालापूर येथील गुळ धरणातून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र नगरपालिका प्रशासन हे गावकरी व शेतकऱ्यांची इच्छा नसतांनाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता नव्या जलवाहिनीचे काम करत असल्यामुळे याला ग्रामस्थांचा तसेच शेतकरी संघटनेचा तीव्र निषेध दिसून येत आहे. या नव्या जलवाहिनीच्या खोदकामामुळे शेतातील बागायती पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केलेला आहे.