जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे सर्व चौकातील वाहतूक सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक चौकात, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. तर वाहतूक पोलिस स्वत: नियंत्रण करीत नसल्याचे चित्र शहरात अाहे.
जळगाव शहरात महामार्गासह उड्डाणपूल, अंडरपास, अमृत योजना अशी विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच चौकातील वाहतूक सिग्नल बंद ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला लॉकडाऊन असल्याने सिग्नलची गरज भासली नाही; परंतु आता अनलॉक झाल्यानंतर सर्व नागरिक नियमितपणे कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अमृतच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहत नाही. अशात मोठ्या चौकांत सिग्नल बंद असल्याने चहुबाजूने येणारी वाहने एकमेकांच्या पुढे निघण्याचा प्रयत्न करतात. वळण घेणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होते. त्यातून वाहनचालकांत शाब्दिक चकमक उडत आहे. किरकोळ अपघातही होत अाहेत. टॉवर चौक, कोर्ट चौक, गोविंदा रिक्षा स्टॉप, बेंडाळे चौक, चित्रा चौक, बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली अशा प्रमुख चौकांत ही समस्या अधिक गंभीर होते आहे. बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांची यात भर पडते आहे. तर दुसरीकडे चौकात नेमलेले वाहतूक पोलिस रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे राहून गंमत पाहताना दिसून येतात.