जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेला वाद वाढत चालला आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय पॅनेलच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण आमदार चिमणराव पाटील यांनी निवडणूक बिनविरोध होण्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे दोघांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हा बँक निवडणूक सर्वपक्षीय बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात दोन बैठकही झाल्या आहेत. त्यावेळी दोन्ही नेते उपस्थित होते. मात्र त्या नंतर आता दोघांमधे अधिकच वाद वाढला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा बँक निवडणूक कित सर्वपक्षीय पॅनल निश्चित करण्यावर होईल अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
यावर जिल्हा बँकेचे संचालक व शिवसेनेचे आमदार तसेच सर्व पक्षीय निवडणूक पॅनेलचे कोअर कमिटी चे सदस्य चिमणराव पाटील बोलताना म्हणाले, दोघांच्या वादामुळे बँक निवडणुकीत भाजप आपली वेगळी चूल मांडेल असे काही वाटत नाही. कारण यापूर्वी ही खडसे व महाजन यांचे वाद सुरूच होते. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल वर त्याचा काही फरक पडेल असे आपल्याला वाटत नाही.
सर्वपक्षीय पॅनल निश्चित होईल, यावर आपला विश्वास आहे. कारण ही शेतकऱ्यांची बँक असून त्यांच्या हिताचे काम करावयाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षीय वादाचा कोणताही प्रश्न नाही. सर्वपक्षीय पॅनल झाले तरी ही बिनविरोध होणार असे सांगून ते म्हणाले, ही लोकशाही आहे. या ठिकाणी कोणीही उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे कोणीतरी उभे राहिलच. मात्र आम्ही सर्व पक्षीय पॅनल म्हणून त्याचा सामना करू.