धुळे राजमुद्रा वृत्तसेवा । गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील यांची लेक व धुळ्याच्या सासरवासी भाजपच्या उमेदवार धरती निखिल देवरे यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत लामकानी (ता. धुळे) गटात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत सरासरी चार हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. धरती देवरे या पोटनिवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती होत्या.
लेकीच्या प्रचारासाठीही खास विमानाने २७ सप्टेंबरला जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेले खासदार सी. आर. पाटील यांनी बोरीस (ता. धुळे) येथील सभेत जागतिक कन्या दिनाचे निमित्त साधत गावातील लेकींचा सुकन्या योजनेंतर्गत पहिला हप्ता मी भरतो, असे सांगून विशेष गिफ्ट दिले होते. खासदार पाटील यांची ही जादू लामकानी गटात कामी आली आणि लेकिच्या विजयालाही हातभार लागला, असे म्हटले तर वावगे म्हणू नये. तसेच महिला व बालविकास समिती सभापती असताना धरती देवरे यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांचे सासरे भाजपचे स्थानिक नेते सुभाष देवरे, पती उद्योजक निखिल देवरे, दीर व बोरीसचे माजी सरपंच विलास देवरे यांची भक्कम साथ धरती देवरे यांना लाभत आल्याने त्यांनी विकास कामांचा लामकानी गटात चांगला धडका लावला होता. विशेष म्हणजे नेते सुभाष देवरे यांचे भाचे कुणाल पाटील हे धुळे तालुका म्हणजेच धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. त्यात लामकानी गटात भाजपच्या धरती देवरे यांच्यापुढे शिवसेनेच्या मिनाबाई पाटील यांचे आव्हान होते. राज्यस्तरावरील महाविकास आघाडीमुळे लामकानी गटात शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला. महाविकास आघाडीमधील घटक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने धुळे तालुक्यात अंतर्गत सामंजस्यातून जागा वाटपाची भूमिका घेतली.
धुळे जिल्हा परिषदेच्या १५ गटांच्या पोटनिवडणुकीत ४२ पैकी ४१ उमेदवार, तर चार पंचायत समित्यांच्या ३० जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत. बोरकुंड (ता. धुळे) गटात शिवसेनेच्या शालिनी बाळासाहेब भदाणे या माघारी प्रक्रियेवेळीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिरपूर तालुक्यात आठ गणांसाठी पोटनिवडणूक होती. त्यात भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या, मतमोजणीअंती सहा जागा भाजपने जिंकल्यामुळे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी त्यांचे वर्चस्व अबाधित राखल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर शिरपूर पंचायत समितीमध्ये प्रथमच भाजपची सत्ता आली आहे.